वर्षभराच्या परिश्रमाअंती अडीच एकरातील धान कापणी व बांधणीनंतर पुंजणे उभारून ठेवले असतानाच १८ नोव्हेंबरच्या रात्री रानटी हत्तींनी शेतात प्रवेश करून काही क्षणांत पिकाची राखरांगोळी केली. तोंडाशी आलेला घास हिरावल्याने नैराश्येच्या गर्तेत गेलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आरमोरी तालुक्याच्या देलोडा बु, येथे शनिवार, २२ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता घडली. खुशाल बैजू पदा (५५) रा. देलोडा (बु.) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
रानटी हत्तींच्या कळपाने १८ नोव्हेंबर रोजी खुशाल पदा यांच्या शेतात धुमाकूळ घालत अडीच एकरातील सर्व धान पुंजणे नष्ट केले. वर्षभर कष्ट करून पिकवलेले पीक काही क्षणात संपल्याने शेतकरी खुशाल पदा नैराश्येच्या गर्तेत गेले. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, घेतलेले कर्ज कसे फेडायचे, पुढचा हंगाम कसा उभा करायचा? या तणावातून ते मानसिकदृष्ट्या खचले. याच नैराश्यातूनच त्यांनी शनिवारी रात्री ११ वाजता विष प्राशन करून आत्महत्या केली, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. रविवारी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. खुशाल पदा यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली आहेत. या घटनेमुळे पदा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Leave a comment