Home गडचिरोलीतील ताज्या घडामोडी ऐतिहासिक वैरागड किल्ल्यात पुन्हा गुप्तधनाचा शोध ? खोदकाम केल्याची धक्कादायक घटना
गडचिरोलीतील ताज्या घडामोडी

ऐतिहासिक वैरागड किल्ल्यात पुन्हा गुप्तधनाचा शोध ? खोदकाम केल्याची धक्कादायक घटना

Gadchiroli : गुप्तधनाच्या लालसेपोटी वैरागड (ता. आरमोरी) किल्ल्याजवळ पुन्हा एकदा अज्ञातांनी खोदकाम केल्याची धक्कादायक घटना ३ डिसेंबर रोजी समोर आली आहे.

Share
Share


वैरागड (जि. गडचिरोली) :
गुप्तधनाच्या लालसेपोटी वैरागड (ता. आरमोरी) किल्ल्याजवळ पुन्हा एकदा अज्ञातांनी खोदकाम केल्याची धक्कादायक घटना ३ डिसेंबर रोजी समोर आली आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजालगत टोकावरील बुरुजाजवळ चार पाच दिवसांपूर्वी हे खोदकाम झाले असून, परिसरात खळबळ उडाली आहे. दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी मोठ्या चाफ्याच्या झाडाजवळही गुप्तधनाच्या शोधात खोदकाम करण्यात आले होते.

ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या वैरागड परिसरात किल्ला, भंडारेश्वर, गोरजाईसह हेमाडपंती देवळांचा मोठा ठेवा आहे. १२ ते १६ व्या शतकात झालेल्या परकीय आक्रमणांच्या भीतीने तत्कालीन लोकांनी देवालये, घरांच्या आवारात किंवा दगडी संरचनांखाली मौल्यवान नाणी, द्रव्य किंवा दुर्मीळ मूर्ती लपवून ठेवत असत. त्या काळातील अनेक घटनांचा उल्लेख आजही गावात दंतकथास्वरूपात केला जातो. या पार्श्वभूमीवर वैरागड परिसरात अधूनमधून घडणारे खोदकाम थांबण्याचे नाव घेत नाही. काही टोळ्या गुप्तधनाच्या शोधात ऐतिहासिक स्थळांची मोडतोड करीत असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे.

वारंवार खोदकाम केले जात असल्यामुळे ऐतिहासिक वैरागड किल्ला आणि परिसराचे विद्रुपीकरण होत असल्याचा इतिहासतज्ज्ञांचा दावा आहे. संवर्धनाच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर वसलेल्या भंडारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगही वीस-पंचवीस वर्षापूर्वी गुप्तधनाच्या शोधात उखडण्यात आले होते. बाहेरील आवाज दडवण्यासाठी त्यावेळी भजनाचा कार्यक्रम सुरू असल्याचा आभास निर्माण करून आत खोदकाम झाले होते. याप्रकरणी पोलिसांत तक्रार झाली; परंतु आरोपींचा शोध लागला नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी शिवलिंगाची नव्याने प्रतिष्ठापना केली.

Share

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

प्रेम, लग्न अन् विश्वासघात… मन हेलावून टाकणारी कथा ! बाळाच्या वाट्याला आले दुर्दैवी भविष्य

Gadchiroli : चुलत भावाच्या लग्नात बँडबाजाच्या पथकातील तरुणाशी तिची ओळख झाली. पहिल्याच...