मुंबई – येत्या मुंबई महापालिकात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पैशांचा महापूर येणार असून प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना १० कोटी रूपये देणार असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हे गंभीर आरोप केले आहेत.
खासदार संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचं मुंबई महापालिकेचे बजेट जवळपास १० हजार कोटींचे असल्याची माझ्याकडे माहिती आहे. प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना १० कोटी देणार आहे. ही माहिती पक्की आहे. नगरसेवक फोडण्यासाठी आधी ५-५ कोटी दिले आणि निवडणूक लढण्यासाठी १० कोटी देणार आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात शेतकरी त्याचे कर्ज फेडण्यासाठी स्वत:ची किडनी विकतोय या गोष्टीची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे असा घणाघात त्यांनी केला.
तसेच एक किडनी विकण्याचं प्रकरण समोर आलंय मात्र अशी असंख्य प्रकरणे आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी हजारो कोटी उधळतायेत. एकनाथ शिंदेंचं मुंबई महापालिकेसाठी बजेट १० हजार कोटींचे आहे. प्रत्येक उमेदवाराला १० कोटी देतील. महापालिकेच्या ठेकेदारांकडून घेतलेले हे पैसे आहेत. कदाचित काही पैसे ड्रग्ज लिंकमधून आलेत. १४५ कोटींचं ड्रग्ज त्यांच्या परिसरात सापडते. साताऱ्यातील पाचगणीत ड्रग्सचे कारखाने कसे उभे राहिले. या पाठीशी कोण आहेत याची ताबडतोब चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमली पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, ड्रग्जच्या विळख्यात तरुणाई अडकली आहे. पूर्वी ड्रग्ज बाहेरून यायचे पण आता महाराष्ट्रात त्याचे कारखाने उघडले जात आहेत. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचे भावाचे नाव यात समोर आले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली पाहिजे, त्यांनी कसं आणि कुणाला या ड्रग्ज रॅकेटमधून वाचवण्याचा प्रयत्न केला हे अंधारे यांनी स्पष्ट केले आहे. या राज्यात ड्रग्ज रॅकेट सत्ताधाऱ्यांच्या घरापर्यंत पोहचले असेल आणि तिथून यंत्रणा राबवली जातेय. मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही शिक्षा होत नाही. त्यात हे ड्रग्ज रॅकेट हे सगळे भयंकर आहे अशी टीका संजय राऊत यांनी महायुती सरकारवर केली आहे.
Leave a comment