Home blog ताज्या घडामोडी ‎बेवारस वृद्धेच्या अंतिम प्रवासाला ‘माणुसकीचा खांदा’, मानवी हक्क दिनी गडचिरोली पोलिसांचा संवेदनशीलपणा 
blog ताज्या घडामोडी

‎बेवारस वृद्धेच्या अंतिम प्रवासाला ‘माणुसकीचा खांदा’, मानवी हक्क दिनी गडचिरोली पोलिसांचा संवेदनशीलपणा 

Gadchiroli News: मानवी हक्क दिनाच्या दिवशी गडचिरोलीत माणुसकीचा जिवंत संदेश देणारी घटना घडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या ७० वर्षीय बेवारस चमेलीबाई आनंदराव कोरम (रा. चंद्रपूर, मूळ रा. छत्तीसगड) यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंतिम प्रवासाला खांदा देण्याची जबाबदारी गडचिरोली पोलिसांनी आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी उचलली.

Share
Share

गडचिरोली –  मानवी हक्क दिनाच्या दिवशी गडचिरोलीत माणुसकीचा जिवंत संदेश देणारी घटना घडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या ७० वर्षीय बेवारस चमेलीबाई आनंदराव कोरम (रा. चंद्रपूर, मूळ रा. छत्तीसगड) यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंतिम प्रवासाला खांदा देण्याची जबाबदारी गडचिरोली पोलिसांनी आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी उचलली.

‎५ नोव्हेंबरला ही महिला आजारी, अशक्त अवस्थेत गडचिरोली बसस्थानक परिसरात बेवारस अवस्थेत आढळली. माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तात्काळ पुढाकार घेत तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी तिची मनापासून सेवा केली. मात्र प्रकृती गंभीर असल्याने ९ डिसेंबर रोजी तिचे निधन झाले.

‎दरम्यान, मृत महिलेच्या चंद्रपूर आणि छत्तीसगड येथील नातेवाईकांशी संपर्क साधूनही कुणी येण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाले. कोणतेही वृद्धाश्रम किंवा सामाजिक संस्था आजारपणामुळे आणि हालचाल नसल्याने तिला स्वीकारण्यास तयार नव्हती. अखेर शेवटच्या क्षणीही कोणीच सोबत नसताना ‘माणुसकी’च्या नात्याने गडचिरोली पोलिसांनी पुढाकार घेत मानवी हक्कांची खरी व्याख्या सिद्ध केली. नातेवाईक नसले तरी गडचिरोली पोलिसांनी दाखविलेली ही माणुसकी आज मानवाधिकार दिनाचा खरा अर्थ अधोरेखित करून गेली.

मानव हक्क दिनी जपला माणुसकीचा धागा 
१० डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिन. साधारणपणे हा दिवस मोठमोठ्या भाषणांतून साजरा होतो. मात्र, एका बेवारस वृद्धेच्या अंत्यसंस्कारातून पोलिसांनी कृतीतून दिलेला संदेश अधिक प्रभावी ठरला. अंतिमसंस्कारावेळी गडचिरोली  ठाण्याचे पो.नि. विनोद चव्हाण, हवालदार योगेश कोरवते,  अजय कोल्हे तसेच गडचिरोली नगरपरिषदचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, वैभव कागदेलवार, राजू मधुमटके, स्वच्छता विभागाचे कर्मचारी  उपस्थित होते.

Share

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *